मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याला तडे गेल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात रस्त्याला तडे जाण्याबरोबरच काही ठिकाणचे कॉंक्रीट निघाल्यामुळे एक मार्गिका वाहतुकीस बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर खेडमधील जगबुडी पुलापाठोपाठ चिपळूणमधील बहाद्दूरशेखनाका येथील वाशिष्ठी पुलावरील एक्स्पानशन जॉईंटचे कॉंक्रीट निघून लोखंड बाहेर पडले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील एक मार्गिका वाहतुकीस बंद करून ती दुसर्‍या मार्गिकेवर वळवण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक वाहनचालकांतून संताप व्यक्त होवू लागला आहे.गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाचे नमुने समोर येवू लागले आहेत. चौपदरीकरण सुरू झाल्यापासूनच बांधलेली गटारे ढासळणे, रस्त्याला भेगा, रस्ता खचणे, संरक्षक भिंती कोसळणे असे प्रकार सातत्याने होत असतानाच महामार्ग विभाग व कंत्राटदार कंपन्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात सावर्डे-वहाळ फाट्यावरील उड्डाणपुलावरील रस्ता खचण्यासह बांधकामांना ठिकठिकाणी तडे गेल्याने हा पूलच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. खेडमधील जगबुडी पुलापाठोपाठ आता मंगळवारी बहाद्दूरशेख नाका पुलावरील एक्स्पानशन जॉईंटचे कॉंक्रीट निघून लोखंड बाहेर आले आहे. हा सारा प्रकार माजी सभापती शौकत मुकादम यांनी उघडकीस आणून राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button