
रत्नागिरीतील अमरधाममध्ये ३६५ दिवस २४ तास सेवा देणाऱ्याचा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने विशेष गौरव
मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला विशेष महत्व आहे. अंत्यसंस्कार होणार्या अमरधाममध्ये ३६५ दिवस २४ तास सेवा करणार्या रत्नागिरीतील चर्मालय, मिरकरवाडा अमरधाममधील दोघा कर्मचार्यांसह कुटुंबियांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने विशेष गौरव करण्यात आला. सण, उत्सव असो अथवा काैंटुबिक सोहळा फोन आल्यानंतर तत्काळ अमरधाममध्ये जावे लागते.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त या विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चर्मालय अमरधाममध्ये मधुकर कळंबटे हे गेली २४ वर्षे सेवा बजावत आहेत. कंत्राटी पध्दतीवर अल्प मोबदल्यात काम करतानाहि त्यांनी सेवेतील आपला प्रमाणिकपणा जपला आहे. अमरधाम मध्ये अंत्यसंस्काराला येणार्या मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी श्री.कळंबटे यांनी अमरधामच्या बाजूला छोटीशी झोपडी उभारली न आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी सौ.वैशाली कळंबटे यांची त्यांना साथ मिळते.
तर मिरकरवाडा अमरधाममध्ये प्रशांत नागवेकर हे गेली २२ वर्षे सेवा बजावत आहेत. स्मशानभुमीची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. शहरातील सर्वात मोठे अमरधाम असलेल्या मिरकरवाडा येथे दहा चनेल आहे. दररोज सहाहून अधिक मृतदेह येथे अंत्यसंस्कारासाठी येतात. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत केव्हाही नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने त्यांना २४ तास अलर्ट रहावे लागते. अशाहि स्थितीत त्यांना कुटुंबाची साथ मिळते. नागवेकर उपलब्ध नसतील तेव्हा त्यांची पत्नी सौ.शितल नागवेकर या अमरधाममधील सर्व व्यवस्था बघतात.
अत्यावश्यक सेवेतील एक वेगळया पध्दतीचे काम करणार्या कळंबटे, नागवेकर दाम्पत्याचा गौरव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक, अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष निलेश जगताप, सचिव राजेश कळंबटे, खजिनदार विशाल मोरे, राजेश चव्हाण, विजय पाडावे, मकरंद पटवर्धन, राकेश गुढेकर, मोरेश्वर आंबुलकर, तन्मय दाते, मीरा शेलार, उमेश सावंत,सचिन बोरकर आदि पत्रकार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेश कळंबटे यांनी तर आभार तन्मय दाते यांनी मानले.
www.konkantoday.com