गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजपनेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे, ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला असून त्यांचा आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर, त्यांच्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या मतदारसंघात आणखी ताकद मिळाली आहे.