खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी विकासाचा रोड मॅप भाजपाकडे तयार- बाळ माने आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, त्यामुळेच डेंग्यू वाढला २४ तास पाणी मिळालेच पाहिजे- नगरपालिकेला अल्टीमेटम
* रत्नागिरी*आताच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेचा जो कारभार बिघडवला आहे, त्यांना एकदा घऱी बसवा. दोन तृतीयांश सत्ता भाजपाला द्या. याचे दूरगामी चांगले परिणाम होतील, असा कारभार करू. खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी भाजपाकडे विकासाचा रो़डमॅप तयार आहे. आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात डेंगी, मलेरियाचे रुग्ण वाढले. तसेच २४ तास पाणी मिळण्यासाठी पालिकेला अल्टीमटेम दिला आहे, अशी माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली.मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून 64 कोटी रुपयांची नळपाणीयोजना 2016 मध्ये रत्नागिरीसाठी मंजूर केली. राज्यस्तरीय नगरोत्थानमधून निधी दिला होता. भाजपाचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, तसेच मिलिंद कीर यांनी या योजनेच्या निर्माणाकरिता चांगले प्रयत्न केले होते. ती योजना दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही. दोन वर्षांत ही योजना पूर्ण व्हायला हवी होती. अकार्यक्षम नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवकांचा हलगर्जीपणा यामध्ये झाला आहे. यांच्यामुळेच आतापर्यंत 90 कोटी रुपये खर्च केला गेला आहे. हा एक भुर्दंड म्हणावा लागेल. डिसेंबरच्या आत 24 तास पाणीपुरवठा झाला पाहिजे, असा अल्टीमेटम माजी आमदार बाळ माने यांनी नगरपालिकेला दिला.खड्ड्यांकरिता आंदोलन केल्यानंतर श्री. माने यांनी सांगितले की, भाजपा चांगला पर्याय म्हणून नक्कीच काम करेल. भाजपाचा नगराध्यक्ष व नगरसेवक रत्नागिरी आदर्श शहर म्हणून प्रयत्न करतील. नागरिकांनी भाजपला साथ द्यावी.ते म्हणाले, रत्नागिरी शहरातील रस्त्यांची गेल्या महिन्यापासून दुरवस्था झाली आहे. कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण चालू होते. अजून अर्धा पाऊस झालेला नाही. रस्त्याचा दर्जा घसरला आहे. याचा सर्वांनाच त्रास होतोय. खराब रस्त्यांच्या कामांच्या दर्जाची चौकशी होणे आवश्यक आहे. आम्ही नगरपालिकेला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्य रस्ता, उपरस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुरुस्ती करणार आहोत.त्यांनी सांगितले की, शहरात डेंगी, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आरोग्य व्यवस्था सक्षम नाही. शहराचा सगळा भार जिल्हा रुग्णालयावर येतोय. डॉक्टर, कर्मचारी नसल्याने रुग्णांना दुसरीकडे न्यावे लागत आहे. फवारणी करणे आवश्यक होते. अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य विभागाने केले आहे. त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आरोग्य दैन्यावस्था लक्ष वेधले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनीही नगरपालिकेला वारंवार निवेदने दिली आहेत. आम्ही आजवर भाजपाचे शांततापूर्ण प्रतिनिधीत्व केलं होते. पण आता भाजपा आक्रमक भूमिका घेईल.*अपघाताचा खर्च द्या*रत्नागिरी शहरात आतापर्यंत खराब रस्त्यांमुळे जे अपघात झाले आहेत, त्याचा खर्च नगरपालिकेने भरून द्यावा. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे, आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याचे दायित्व पालिका व ठेकेदारांनी घ्यावे.*प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी नियोजन*विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहे. रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोड मॅप भाजपाकडे तयार आहे, प्रत्येक प्रभागासाठी नियोजन करणार आहोत. रत्नागिरीच्या विकासाचे वाटोळे करणाऱ्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला पाहिजे. रत्नागिरी शहर आदर्श होण्याकरिता वेळ आली की मतदारांना रोड मॅप सादर करू, असे प्रतिपादन भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, राजू भाटलेकर, महेंद्र मयेकर, अमित विलणकर, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, संतोष बोरकर, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, नितीन जाधव, सचिन गांधी, मंदार खंडकर, विक्रम जैन आदी अनेकजण उपस्थित होते.