वीज लपंडवाने त्रस्त झालेले पोमेंडी, हरचेरी पंचक्रोशीतील संतप्त वीज ग्राहक महावितरण कार्यालयावर धडकले,जोडणी तोडायला आलात तर विद्युत खांबाला डांबू- बंड्या साळवी भडकले
तब्बल तीन महिने वीजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या पोमेंडी, हरचेरी पंचक्रोशीतील संतप्त वीज ग्राहक महावितरणच्या नाचणे कार्यालयावर धडकले. साहेब एसीत बसून मस्त, जनता मात्र त्रस्त अशा घोषणा देत दालना बाहेर बोलवून प्रवेशद्वारावर चर्चा केली. यापुढे या भागातील लाईट गेला तरी महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याला रस्त्यावर फिरून देणार नाही. जोडणी तोडायला आलात तर विद्युत खांबाला डांबू, असा खणखणीत इशारा ग्राहकांच्यावतीने उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी, हरचेरी,चिंचखरी, टेंबे, सोमेश्वर, तोणदे आदी भागातील विद्युत ग्राहकांना गेल्या तीन वर्षांपूर्वी कुवारबाव उपकेंद्रातुन विद्युत पुरवठा होत होता. परंतु त्यानंतर हा विद्युत पुरवठा पानवल उपकेंद्रातून करण्यात आला. मात्र तेव्हापासून पावसाळ्यात या भागातील वीज ग्राहकांना वारंवार खंडित विद्युत पुरवठाचा सामाना करावा लागत आहे. गेली तीन महिने हे ग्राहक विजेच्या या खेळखंडोब्याला तोंड देत आहेत.वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. दोन ते तीन दिवस लाईट येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या या पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांची सहनशिलता संपली आणि आज जमावाने महावितरणच्या नाचणे कार्यालयावर धडकले.या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर यांनी केले. महावितरणच्या अधिकाऱ्यांना दालणातून बाहेर बोलवण्यावरून वाद झाला. कार्यकारी अभियंता श्री. साळवी बाहेर येत नसल्याने जमाव कार्यालयात शिरला. यामुळे काहीसा गोंधळ झाला. परंतु बंड्या साळवी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना जमावासमोर उत्तर देण्यास सांगितले.ग्रामस्थांच्या वतीने बंड्या साळवी यांनी अधिकारी श्री. साळी यांच्याशी चर्चा केली. गेली तीन महिने नागरिक वारंवार होणार्या विद्युत पुरवठ्यामुळे हैराण आहेत. पानवल उपकेंद्रावरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे तत्काळ या भागाला पुर्वी प्रमाणे कुवारबाव उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा करावा. दरवर्षी पाण्यात जाणार्या डीपीची उंची वाढवावी, तसेच तेथील महावितरणचे कर्मचारी श्री. केळकर यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तो कोणाचे काही एकत नाही. त्यामुळे त्याची पहिली बदली करावी आणि जोवर कुवारबाव उपकेंद्रातून विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही, तोवर विनाखंडित विद्युत पुरवठा या भागातील ग्रामस्थाना करावा, असे लेखी आश्वासन तुम्ही द्यावे, अशीमागणी केली. लेखी आश्वासन ग्रामस्थांना देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.चार दिवसात कुवारबाव उपकेंद्रातुन जोडणीमहावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. साळवी म्हणाले, पोमेंडी पंचक्रोशीला पानवल उपकेंद्रातून विद्युत पुरवठा सुरू आहे. तो कुवारबाव उपकेंद्रातुन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी हा बदल केला आहे. शहरातील काही लोड त्यावर टाकल्याने ओव्हरलोड झाल्याने हा बदल झाला होता. पुन्हा कुवारबाव उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्यासाठी ४ विद्युत खांब टाकावे लागणार आहेत. १५ किमी लाईन टाकावी लागणार आहे. त्यासाठी ४ दिवस जाणार आहेत. असे सांगितले