मुंबईत विकत होते सात लाखाच्या बनावट नोटा, रत्नागिरी जिल्ह्यातील चौघा आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई मानखुर्द फ्लाय ओव्हरच्या बाजूला क्राईम ब्रांचच्या पथकाने 7 लाख 10 हजारांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील चौघा आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. हे चौघेजण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील आहेत.शहानवाज आयुब शिरलकर ( ५०, शिरल, ता. चिपळूण), राजेंद्र आत्माराम खेतले (४३, पाचाड, मालघर, चिपळूण), संदीप मनोहर निवळकर (४०, संगलट, खेड), ऋषिकेश रघुनाथ निवळकर (२६,संगलट, खेड ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ही कारवाई 19 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, मानखुर्द फ्लाय ओव्हरच्या बाजूला भारतीय बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी लाल रंगाची एक कार फ्लाय ओव्हर जवळ येऊन थांबली. कारमधून झडती घेतली असता कार मध्ये शहानवाज शिरळकर, राजेंद्र आत्माराम खेतले, संदीप मनोहर निवळकर, ऋषिकेश निवळकर हे बसलेले दिसून आले. गाडीमध्ये ऋषिकेश निवलकर यांच्या पायाजवळ पांढऱ्या रंगाच्या पिशवी मध्ये बनावट नोटा आढळून आल्या. कारमधून 7 लाख 10 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. संशयिताकडे 100 च्या 1600 नोटा, 200 च्या 2400 नोटा आणि 500 च्या 300 नोटा बनावट असल्याचे आढळून आले.या प्रकरणी पोलिसांनी शहानवाज शिरळकर, राजेंद्र आत्माराम खेतले, संदीप मनोहर निवळकर, ऋषिकेश निवळकर या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांनी या नोटा कुठून आणल्या? त्या कुठे वितरीत केल्या जाणार होत्या? याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button