
एक उंदीर पकडा व बावीस रुपये मिळवा , सहा महिन्यात केला
प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जीवघेणे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणार्या सुमारे १ लाख ६० हजार उंदरांचा खात्मा मुंबई पालिकेने जानेवारीपासून आतापर्यंत अवघ्या सहा महिन्यांत केला आहे. या ‘मूषक नियंत्रण’ मोहिमेत प्रादुर्भाव आढळणाऱया ठिकाणी विषारी गोळ्या टाकून आणि रात्रपाळीत उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांच्या आलेल्या तक्रारींनुसार पालिकेकडून कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.
सस्तन प्राण्यांमध्ये मोडणाऱया उंदीर किंवा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर पिल्लांना जन्म देते.एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिल्ले ५ आठवड्यात प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे १५ हजारापर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात. उंदीर-घुशींमुळे होणार्या रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसिस या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे.घरात उंदरांचा प्रादुर्भाव असल्याबाबत पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर उंदीर पकडण्याचे पिंजरे दिले जातात. घराबाहेरील उंदीर उपद्रव नियंत्रणाकरिता मूषकनाशकाच्या गोळ्या टाकण्यात येतात. यामध्ये सेलफॉस गोळ्या उंदरांच्या बिळामध्ये टाकल्या जातात. ही कामे कीटकनाशक विभागाचे कर्मचारी करतात. तर खासगी संस्थाच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी उंदीर मारलेही जातात. यासाठी एका उंदरामागे पालिका २२ रुपये देते. विशेष म्हणजे संपूर्ण मुंबईत मारलेले उंदीर दररोज एकत्र केल्यानंतर परळ येथील सेंटरमध्ये मोजले जातात.
यातील १० टक्के उंदरांची प्लेगसाठी चाचणी केली जाते. यानंतर मृत उंदरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते अशी माहितीही नारिंग्रेकर यांनी दिली.
www.konkantoday.com