तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी सामाजिक जबाबदारी ठेवून सर्वांनी उच्चाटनासाठी काम करावे -पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी पडत आहे. हे कटुसत्य जाणून घेऊन सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन अंमली पदार्थांच्या विरोधात, उच्चाटनासाठी काम करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नार्को को ऑर्डीनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक निलेश माईनकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, शिक्षण विभागाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळा कॉलेजमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करावी. त्याचे दुष्परिणाम सांगावेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रलंबित तडीपारीचे प्रस्ताव मार्गी लावावेत. शहर परिसरातील संशयित ठिकाणी स्थानिक पोलीसांनी गस्त वाढवून, अंमली पदार्थ विक्रीबाबत तपासणी करावी. अंमली पदार्थ विरोधातील हे एक दिवसाचे काम नाही, यामध्ये सातत्य हवे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी मोहीम अधिक तीव्र करावी. 24 तास सुरु असणाऱ्या औषध दुकांनाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करावी. बंद असणाऱ्या कारखान्यांमधून काही अंमली पदार्थांची निर्मिती होते का? याबाबतही एमआयडीसीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, असेही पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले.000