गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प कलामंचतर्फे यमुनाबाई खेर ट्रस्ट संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी :* अलीकडेच अमृत (७५ वर्षे) महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयात हजारो विद्यार्थी खेड्यापाड्यातून येऊन राहिले. सुशिक्षित झाले व स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि उच्च पदावरही कार्यरत आहेत. संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल संकल्प कलामंचने श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट या संस्थेला संस्था गौरव पुरस्काराने सन्मानित केले. मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयोजित केला होता.संकल्प कलामंच, भारतीय नाविक सेना युनियन, मुंबई आणि टी.डब्ल्यू.जे. कंपनी प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. रत्नागिरीमध्ये सामाजिक क्षेत्रात वावरत असताना सामाजिक जाणिव ठेवून आपण समाजाचे काही तरी देणं लागतो, याचे भान ठेवून विविध क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्तीमत्व शोधून त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये सामाजिक संस्था, साहित्यिक, डॉक्टर, लेखक, कवि, पत्रकार, उद्योजक, कलाकार, खेळाडू, कीर्तनकार इत्यादी अनेकांना गौरविण्यात आले.या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन जोग, सह्याद्री वृत्तवाहीनी निवेदिका सौ. भक्ती सावंत, संकल्प कलामंचचे अध्यक्ष विनोद वायंगणकर, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे तसेच यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. खेर ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग पेठे, संचालक बाळकृष्ण शेलार, माजी विद्यार्थी रघुविर शेलार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सर्वोदय छात्रालयाचा गौरव करताना डॉ. दिलीप पाखरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी अभिमानास्पद प्रशंसा केली. त्यांनी स्वतः १००१ रुपये भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.