वहाळफाटा महामार्ग उड्डाणपूल वाहतुकीस बंद
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात सावर्डे वहाळफाटा येथील उड्डाणपुलाजवळील कॉंक्रीटीकरणाला ठिकठिकाणी भेगा जावून ते खचत चालल्याने अखेर या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने घेतला आहे. गुरूवारपासून दोन्ही सर्व्हिस रोडने वाहतूक वळविण्यात आली आहे. कॉंक्रीटीकरण खचण्याबरोबरच तेथील संरक्षक भिंतीच्या जॉ×ईंटसह पूल बांधकामाला ठिकठिकाणी तडे गेल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ कि.मी. दरम्यानच्या चौपदरीकरणातील वहाळफाटा येथे उभारण्यात आलेला साडेतीनशे मीटर लांबीचा उड्डाणपूल गेल्या मे महिन्यात दुतर्फा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलासाठी दोन्ही बाजूने मातीचा भराव करण्यात आला. मात्र गेल्याच महिन्यात सावर्डे परिसरात झालेल्या पावसात हा मातीचा भराव अक्षरशः वाहून गेला. त्यानंतर उड्डाणपुलाजवळील सावर्डे पोलीस स्थानकाच्या बाजूच्या मार्गिकेवरील कॉंक्रीटीकरणाला मोठी भेग गेली. त्यानंतर या भेगेतून पाणी झिरपल्याने तेथील कॉंक्रीटीकरण खचले. परिणामी कंत्राटदार कंपनीने तातडीने डांबरीकरणाचा थर तेथे टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती अयशस्वी झाल्याने ही मार्गिका वाहतुकीस बंद ठेवून दुसर्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवली. www.konkantoday.com