
अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नये, येथील जनता त्यांना कोकणाचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही- भास्करराव जाधव
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. भाजपने राणेंना उमेदवारी दिल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. भाजपच्या या नेत्यांच्या दौऱ्यांवरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला इशारा दिला आहे. खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. तरीही खाशाबा यांनी त्यांना पराभूत करत सुवर्णपदक पटकावले होते. विनायक राऊतही राजकारणात तसेच आहेत. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात यायच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तरी विनायक राऊत आणि कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जाधव यांनी भाजपच्या या नेत्यांना दिला. विनायक राऊत आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना मिळणाऱ्या जनतेच्या पाठिंब्यामुळे ते विजयाची हॅटट्रिक करतील, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होत आहे. www.konkantoday.com