18 वर्षानंतर माझं काय? अनाथ आश्रमातील मुलांची कैफियत…. सिमाली भाटकर – गंधेरे, रत्नागिरी.
अनाथ हा शब्दच मुळात माणसाच्या मनाला चटका लावून जातो. खर तर अनाथ या शब्दाची व्याख्याच करणे कठीण आहे. आज अनाथ याविषयी माझी व्याख्या व व्यथा मी अनाथ म्हणून मत सांगणार आहे. माझे आई बाप नाहीत म्हणून मी अनाथ असे जग समजते पण प्रत्यक्षात मात्र कधी स्वतःच्या पापाचे पितळ उघडे पडू नये म्हणून तर कधी मुलगी नको, कधी नाबालिकतेचा फायदा घेऊन आम्हांला लावारीस म्हणून टाकतात.
पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा स्वतःच्या कर्तुत्वावर काही तरी करुन दाखवयाचे म्हणून कष्टत राहणारे आम्ही ….सर्वच अनाथ. जगाच्या मते हिच आमची व्याख्या.पण मला कधी ह्या जगाने कधी मायेने विचारलं का, बाळां तुला काय आवडते बरं? तुला शाळेत जायला आवडेल? तू इथून बाहेर पडल्यावर काय करणार आहेस? त्यात मी जर मुलगी असेल तर खूपच वाईट. कधी कोण माझा गैरफायदा घेईल सांगता येत नाही.असे बरेच वेळा घडले. मग पुन्हा मनात नैराश्य, हीनपणाची भावना निर्माण होते. का मी एक अनाथ आहे?
शासन म्हणे आम्हाला पोटभर अन्न पुरवते पण ते आम्हाला पुरते काहो?आम्ही शाळेत शिकावे पण तितकी फि नसते आमच्याकडे. आजच्या घडीला आमची संख्या पुष्कळ व आम्हांला मिळणारे अनुदान अतिशय नाममात्र जे कि चटणीला पुरत नाही. अनेकदा भाकर किंवा चपाती पाण्यात बुडवून खावी लागते आम्हाला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थाना शासनाच्या नाममात्र अनुदानच्या धोरणामुळे खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये भर पडते पांढरपेशी भ्रष्ट अधिकारी व शासनाची ‘सिस्टीम नावाची ‘यंत्रणा, यांचा एवढा प्रचंड त्रास असतो कि एक वेळा हे अधिकारी वर्ग विसरतात आम्ही अनाथ याच यंत्रणाचा भाग आहोत.
मुलगी झाली म्हणून रस्त्यावर फेकून देणे कितपत योग्य आहे? एक स्त्री आहे म्हणूनच या जगात मुलगा वा मुलगी जन्म घेत असते मग हा भेदभाव कशाला ? स्वतःच्या शारीरिक सुखासाठी आजचे तरुण तरुणी कोणत्याही थराला जातात. त्यांच्या नविन विचारसरणीला माझा विरोध नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यातून जी मुले जन्माला येतात, त्यांना लाचारीचे जीवन जगण्यासाठी कचराकुंडी, रस्त्यावर फेकून देतात ह्या कृतीला जबाबदार कोण ?कारण जन्माला आल्या पासून मृत्यू पर्यंत मनात सलत राहते हे लाचारीपणाचे जगणे. कुणी तरी आपले होते पण त्यांनीच आपल्याला रस्त्यावर टाकून दिले. मलाही वाटते शाळेत जावे, आहे त्या परिस्थितीत जगण्यासाठी आम्ही धडपड करतो पण आमचा हा अमानुषपणाचा भूतकाळ मला जगू देत नाही. मुळातच हा अमानुषपणा कधी संपणार? कोण मला देणार मदतीचा हात ? कोण माझ्यातील माणूसकीला जपणार किंवा जागवणार? वरील असे अनेक प्रश्न लहानपणापासून आमच्या मनात आहेत पण कधी ओठांवर येत नाही. तरी १८ वर्ष पूर्ण होत आले कि इवलेसे पंखाना बळ देत जगणे सावरु पहात आहे. कधी संस्कार कमी पडतात तर कधी मार्गदर्शन. अनाथ म्हणून लहानपणापासून होणारी हीन भावना, अवहेलना इत्यादी मन एवढे पोलादी बनते कि फक्त माणूसकी पासून भीती वाटते. मुलगी म्हणून बाहेर पडताना कधी कोण तो घाणेरडा स्पर्श देऊन जाईल सांगता येत नाही.
आज या मंचावरुन तुम्हांला सर्वांना नम्र विनंती आहे कि तुम्ही जशी आम्हा अनाथांना जगण्यासाठी अनाथश्रम दिले ,थोडेसे बळ दिले,आणखी एक छोटासा उपकार तुमच्यातील जे शिकलेले आहेत त्यांना आमच्याकडे पाठवा, आमच्या भावना-विचार जाणून समजून घ्या म्हणजे एका नव्या सृष्टीचा जन्म होईल जिथे कोणी अनाथ असणार नाही. आम्ही देखील तुमच्या सारखे मन मोकळे आहोत. आमच्या सोबत फक्त एक दिवस जगा व आम्हाला भविष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करावे.
१. स्पर्धा परीक्षा कशी द्यावी?…कदाचित आम्ही देखील चांगले अधिकारी होऊन अजून एखाद्याला पुढे आणू.
२. आम्हांला काय आवडते ते जाणून घ्या…..मी देखील लता मंगेशकर ,सचिन तेंडुलकर बनू शकतो.
३. विशेषतः अशी टिम बनवा जेणेकरुन आम्ही उज्जवल भवितव्य घडवू शकू, आम्हांला देखील ओढ लागेल जगण्याची परक्यानसोबत.
४. छोट्या रोजगारांची माहिती द्या ज्यामुळे आम्हांला कष्टाची ओढ वाटेल.
५. मुलगी असेल तर पाहण्याची दृष्टी माणूसकीची ठेवा, कामवासनेची नको. जगण्यासाठी थोडेसे बळ द्या म्हणजे मी पुन्हा अनाथ होणार नाही.
6. जमलं तर एक पुस्तकं नक्कीच आणा हळूहलु आम्हांला ही लागेल वाचनाची आवड आणि होईल छोटंसं आमचंही ग्रंथालय बोलण्या सारखे खूप आहे पण आता थांबते. नक्की वाचा व मदत करा. मग कदाचित मलाही जगण्यास बळ मिळेल व मी ही भरभरुन जगेल मनासारखे १८ वर्षानंतर देखील. धन्यवाद.