
बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे, सन २०२४ साठीचे १२ विशेष तपस्वी गौरव पुरस्कार जाहीर
गेली १२ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती तसेच विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टला आता १२ वर्ष पूर्ण झाली आहेत .या एक तपाच्या कालावधीच्या पुर्तातेनिमित्त बोडस चॅरिटेबल ट्रस्टने, सन २०२४ साठीचे १२ विशेष तपस्वी गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.हे विशेष तपस्वी गौरव पुरस्कारप्राप्त गौरवमूर्ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक, खाजगी आणि ग्रामदेवतांच्या निवृत्त आणि विद्यमान पदाधिकारी, खोत, सरपंच, मानकरी व त्यांचे वारस आणि वहिवाटदार मालक या प्रवर्गातून निवडले आहेत. यापैकी १० देवस्थाने ही भारतीय संस्कृती मधील पौराणिक देव-देवतांची असून २ देवस्थाने ही सामाजिक ऐक्याची प्रतीके आहेत. एकूण ४ मंदिरे ही खाजगी , १ मंदिर गावकीचे असून उर्वरित ७ मंदिरे ट्रस्टमार्फत चालवली जातात. या विशेष तपस्वी गौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिकसन्मानपत्र, शाल , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुस्तक आणि रोख रुपये २,००० असे आहे. या गौरवमूर्ती मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ व्यक्तीचा समावेश आहे.उत्तर रत्नागिरी येथील परशुराम (चिपळूण) येथील कोकण किनारपट्टीचा निर्माता अशा भगवान परशुरामाच्या मंदिराचे स्थानिक विश्वस्त ह.भ.प. अभय नारायण उर्फ अभयमहाराज सहस्रबुद्धे,तसेच हेदवी (गुहागर) येथील दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराची मातृसंस्था श्री लक्ष्मीनारायण संस्था हिचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद गजानन जोगळेकर, आणि मोर्डे (संगमेश्वर) येथील शिवपार्वतीची मूर्ती असलेल्या ( शंकराची पिंडी नाही) कोकणातील एकमेव शिव मंदिराचे कार्यवाह श्री. संजय वसंत सरदेसाई हे ३ जण उत्तर रत्नागिरीमधील गौरवमूर्ती आहेत.रत्नागिरी तालुक्यातील ६ गौरवमूर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- कार्तिकेय मंदिर दांडेआडोम येथील मंदिराचे सरपंच श्री. पुरुषोत्तम विश्वनाथ दांडेकर, स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिराचे २०१८ पर्यंत अध्यक्षपद भूषविलेले ॲडव्होकेट प्रदीप चंद्रकांत उर्फ बाबासाहेब परुळेकर, रत्नागिरीची ग्रामदेवता असलेल्या श्री भैरी मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रविंद्र उर्फ मुन्नाशेठ सुर्वे, बंदररोड रस्त्यावरील भगवान श्रीकृष्णाच्या अशा पुरातन मुरलीधर मंदिराचे वहिवाटदार मालक व सावकार फडके यांचे वंशज श्री. अतुल श्रीधर फडके( सध्या वास्तव्य ठाकुरद्वार मुंबई ) , रत्नदुर्ग किल्ला तेथील देवी भगवती मंदिराचे दुसऱ्या पिढीतील मानकरी व उपाध्यक्ष श्री. श्रीकांत भास्कर सारंग आणि पूर्णगड येथील सरदार फडके यांच्या खाजगी श्रीराम मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम नारायण फडके. सिंधुदुर्ग जिल्यातील ३ गौरवमूर्तीमध्ये कुडाळ येथील १०२ वर्षे जुन्या आणि कोकणातील पहिल्या साईमंदिराचे तिसऱ्या पिढीचे मानकरी श्री. राजन श्रीपाद माडये , परुळे (वेंगुर्ला) येथील ७०० वर्षांची परंपरा असलेल्या श्री. आदिनारायण (सूर्य) देवस्थानाचे अध्यक्ष श्री.अनंत शिवराम (सामंत ) देसाई आणि दाभेली(वेंगुर्ला) या गावातील सुमारे १०० वर्षे जुन्या अशा खाजगी दत्तमंदिराचे वहिवाटदार मालक श्री, गौतम रमाकांत प्रभू दाभोळकर यांचा समावेश आहे.पुरस्कार प्राप्त १२ व्यक्तींपैकी पैकी रत्नागिरी तालुक्या बाहेरील ७ सन्मानिताना त्यांचे सन्मानपत्र , शाल आणि पुस्तक त्यांच्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवले जाणार आहे, आणि पुरस्काराची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील उर्वरित ५ सन्मानिताचा गौरव, २४ जुलै २०२४ ते ०५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.