लाडकी माझी बहिण योजनेत कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून रत्नागिरी तालुक्यातील बहिणींची हेळसांड होत असल्याचा भाजपाचे रत्नागिरीचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांचा आरोप
*_महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, यांनी लाडकी माझी बहिण योजना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविणे बाबत शासनाचा जीआर काढला असून त्याची संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी होत असतानाच रत्नागिरी तालुक्यातील बहिणींची हेळसांड होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी केला आहे.या संदर्भातील निवेदन त्यांनी रत्नागिरीच्या तहसीलदार यांना दिले आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे सदर योजने साठी रेशन कार्ड आवश्यक असल्याने तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य जनता ही वारंवार तहसीलदार कार्यालयात जात असते. परंतु रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे त्यांना किती दाद देतात याचे मूर्तिमंत उदाहरण हे सध्या रत्नागिरी मधे घडते आहे. लोकांची रेशनिंग विभागाकडून फसवणूक होत आहे. तहसीलदार कार्यालयात हे सर्वसामान्य लोक पुरवठा विभागात रेशन कार्ड साठी गेल्यास तेथील काही कर्मचारी रेशन कार्ड वर चुकीचे नाव घालून, कधी नवीन रेशन कार्ड साठी उत्पन्नाचा दाखला घेऊन या, तसेच कधी कधी पुरवठा विभागात फक्त दोनच कर्मचारी असल्याची कारणे सांगून त्यांची कामे टाळत असल्याचे दिसून येत आहे.पुरवठा विभागाने नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लोकांची जुनी रेशन कार्ड जमा करून घेतलेली आहेत. व नवीन रेशनिंग कार्ड साठी आवश्यक असलेली वेगवेगळी कागदपत्रे घेऊन या, व या पूर्वी ज्यांनी कागदपत्रे जमा केलेली आहेत ती कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगून, सर्व्हर काम करीत नाही अशी विविध कारणे सांगून वयोवृध्द व्यक्तींना वारंवार तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या मारायला भाग पाडत आहेत. यातून तेथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी दिवसाला किती लोकांची रेशन कार्ड देतात ? असा सवाल श्री. निवळकर यांनी उपस्थित केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेसाठी उत्तम काम करत असताना मात्र रत्नागिरीतील अधिकारी सर्वसामान्य लोकांना एका कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या मारायला लावत आहेत.या संदर्भात पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांची चौकशी होऊन त्यांचेवर कारवाई व्हावी अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना घेवून कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवळकर यांनी तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.