जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला पालकमंत्री सामंत यांच्याकडून दिलासा अवैध वृक्ष तोडीला पन्नास हजार दंड शिथिल करण्याची हमी
(रत्नागिरी दि. १९ जुलै २०२४)*राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी जिल्ह्यातील शेतकरी, लाकूड व्यापारी यांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून त्वरीत दिलासा दिला आहे. यामुळे शेतकरी लाकूड व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवैध वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वन अधिनियम १९६४ च्या कायद्यातील तरतुदीनुसार अवैध वृक्ष तोडीला प्रती वृक्ष एक हजार रुपये इतका दंड करण्यासाची तरतूद आहे. मात्र अवैध वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी पन्नास हजार रुपये इतका दंड करण्यात यावा अशी मागणी वनमंत्री महोदयांनी अधिवेशनात केली आहे. वनमंत्री यांनी केलेल्या मागणी मुळे जिल्ह्यातील शेतकरी, लाकूड व्यापारी यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता तब्बल नव्वद टक्के इतके खासगी मालकी वनक्षेत्र आहे. केवळ एक टक्के इतके शासकीय वन क्षेत्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची आर्थिक रोजी रोटी प्रामुख्याने वनशेती वर अवलंबून आहे. वनमंत्री यांनी केलेल्या मागणी मुळे हवालदिल झालेल्या रत्नागिरी जिल्हा शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेच्या असंख्य सदस्यांनी आज दिनांक १९ रोजी पाली येथे जिल्हयाचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांची भेट घेतली. निवेदन सादर केले. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक, आर्थिक परिस्थिती जाणिव असलेल्या पालकमंत्री सामंत साहेब यांनी तात्काळ राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दुरध्वनी वर संपर्क साधला. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती विशद करून रत्नागिरी जिल्ह्यातील नव्वद टक्के खासगी मालकी लक्षात घेऊन केवळ शासकीय वनक्षेत्रात अवैध वृक्ष तोडीला दंड करण्यात यावा. तसेच खैर आईन, किंजळ ही झाडे सुध्दा विनापरवाना वर्गवारीत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी वनमंत्री महोदयांकडे केली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्री सामंत यांच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचे अभिवचन दिले. यामुळे शेतकरी लाकूड व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यामुळे पालकमंत्री सामंत यांना विशेष आभार मानले. यावेळी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, संदीप सुर्वे, उमेश गांधी, योगेश चव्हाण, अनंत मनवे, राजेंद्र शिंदे, सतीश सप्रे, प्रमोद जाधव, सुरेश पंदेरे, दिनेश चाळके हुसैन काझी, सुनील कानडे, सतीश चाळके, बबन कानाळ संतोष बोडेकर, संजय बावदाने, आदींसह अनेक शेतकरी लाकूड व्यापारी उपस्थित होते.