मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांना सक्षम करण्यासाठी 46 हजार कोटीची तरतूद -पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे. ही योजना कायमस्वरुपी असणार आहे, त्यासाठी 46 हजार कोटींची तरतूद करुन सिंहाचा वाटा शासनाने दिला आहे. या योजनेच्या लाभापासून एकही महिला सुटणार नाही, यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. लांजा येथील गणेश मंगल कार्यालयात पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, प्रांताधिकारी वैशाली माने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार प्रमोद कदम आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, महिला आर्थिक नियोजन करताना, त्यामध्ये शासनाचा सहभाग असावा, या भावनेने ही ऐतिहासिक योजना सुरु करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात जरी या योजनेचा अर्ज भरला तरीही जुलैपासूनच त्याचा लाभ मिळणार आहे. दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा करण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. अंगणवाडी सेविकांनी स्वत:चे घरचे काम समजून या योजनेचे काम सुरु केले आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ही योजना चिरकाल टिकणारी असून, भविष्यात कदाचित तिच्या रकमेत वाढच होणार आहे. शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना अशा सर्व योजनांचा लाभार्थींनी लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले.*नियोजन मंडळातून पत्रकारांसाठी विशेष योजना* पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याबरोबरच पत्रकारांसाठीही नियोजन मंडळातून विशेष योजना लागू केली जाईल. त्याबाबत आराखडा आणि निकष तयार करुन द्यावेत, असेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी विविध योजनांची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातील दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, पिवळे आणि केशरी शिधा पत्रिकांचे वितरण करण्यात आले. शेवटी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी आभार मानले.000