विशाळगडावरील ७० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त
विशाळगडावरील अतिक्रमण हटावची मोहीम सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने प्रचंड बंदोबस्तात सुरू केली. दिवसभरात ७० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.कारवाई दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडावरच तळ ठोकला होता. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहीमेला रविवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी विशाळगडासह गजापूर परिसरातील मुसलमानवाडीला लक्ष्य करत प्रचंड तोडफोड, जाळपोळ केली. या घटनेची सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली जाईल, अशी ग्वाही संभाजीराजे यांना दिली होती. त्यानूसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले.सोमवारी सकाळपासून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. याकरीता २०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याकरीता २५० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासून गडावर केवळ स्थानिक रहिवाशी आणि अतिक्रमण निर्मूलन कारवाईतील सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. याव्यतिरिक्त गडाकडे येणाऱ्यांचे प्रवेश रोखण्यात आले होते. हातोडा, लोखंडी पार आदी पारंपरिक साधनासह इलेक्ट्रीक कटर आदी साधनांसह मजूर, कर्मचाऱ्यांनी दिवसभरात ७० अतिक्रमणे हटवली.