समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा-आमदार वैभव नाईक
मालवण येथील बंदर जेटी लगतच्या समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहामध्ये केली.येथील समुद्र किनारपट्टीवर ११ मे रोजी पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक समुद्रात पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी या ठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेले शालेय विद्यार्थी वरद सापळे, समर्थ गावकर, सुरेंद्र गावकर आणि हर्ष कुबल यांनी समुद्रामध्ये झोकून देऊन समुद्रात बुडणाऱ्या त्या व्यक्तीचे प्राण वाचविले. या विद्यार्थ्यांनी केलेल्या अतुलनीय धाडसाचा सन्मान म्हणून त्यांना ‘शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यासाठी राज्याने केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.