
खरीप हंगामामध्ये भात व नाचणी पेरणीबाबत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
*रत्नागिरी, दि. 28 :- जिल्ह्यात 21 मे पासून सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात ४६८.२ मिमी पाऊस झाला आहे. यापूर्वी मे महिन्यामध्ये इतका कधीही पाऊस पडलेला नाही. पेरणी साधारणपणे जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये होत असते. म्हणजेच पेरणीचा हंगाम गेलेला नाही. पाऊस सतत पडत असल्यामुळे पेरणी पुढे गेली तरी चालल्यासारखे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवस पेरणी करू नये. यापुढे 4 ते 5 दिवस पाऊस थांबल्यानंतर ऊन पडल्यानंतर भात पेरणी करणे सोईस्कर होईल.
माहे मे 2025 मधील तालुकानिहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे. चिपळूण तालुका सरासरी 24.7 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 458.30 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1855.50 मिमी. दापोली सरासरी 26.30 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 418.50 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1591.30 मिमी. खेड सरासरी 22.7 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 373.50 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1645.40 मिमी. गुहागर सरासरी 21.90 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 518.90 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 2369.40 मिमी. मंडणगड सरासरी 20.70 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 371.50 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1794.70 मिमी. रत्नागिरी सरासरी 55 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 566.60 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1030.20 मिमी. संगमेश्वर सरासरी 51.50 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 502.70 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 976.10 मिमी. राजापूर सरासरी 32.50 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 451.60 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1389.50 मिमी आणि लांजा तालुका सरासरी 40.10 मिमी, प्रत्यक्ष पाऊस 483.40 मिमी, पडलेल्या पावसाची टक्केवारी 1205.50 मिमी.
आजच्या परिस्थितीमध्ये भात पेरणी करायची असल्यास वरकस जमिनीवर नांगरणी करून गरव्या भात वाणांची उंच गादी वाफे तयार करून पेरणी करावी. पुढेही पाऊस असाच राहिला तर भात बियाणे १२ तास कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. त्यानंतर पाण्यातून काढून गोणपाटामध्ये २४ तास बांधून ठेवावे. गोणत्याच्या चारही बाजूंनी भाताचा सुका पेंढा अंथरावा. अशा पद्धतीने २४ तास झाल्यानंतर भात बियाण्याला कोंब आल्यावर हे बियाणे गादी वाफ्यावर पेरणी करावी. दोन ओळींमध्ये साधारणपणे १० ते १५ सेमी अंतर राखावे. असा शेतपीक कृषी संशोधन केंद्र, शिरगावचे हवामान सल्ला प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिला आहे. या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. जेणेकरून कृषी, महसूल व ग्रामविकास खाते यांच्याकडून होणारे संयुक्त पंचनामे होणे सोयीचे होईल. अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व खातेदारांनी आपली शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांची नोंदणी प्रलंबित आहे अशा सर्व खातेदारांनी 31 मे 2025 अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. त्याशिवाय त्यांना पी एम किसान योजनेतील पुढील 20 वा हप्ता वितरण होणार नसल्याचे शासनाचे निर्देश आहेत. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वत: नोंदणी करता येणार आहे. तसेच महा ई सेवा केंद्र आणि कृषी विभाग/महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी /कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांचेशी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.