नवे शैक्षणिक वर्ष सुरू होवून एक महिना,मात्र विद्यार्थ्यी जुन्या गणवेशावरच शाळेत
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होवून एक महिना झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावरच शाळेत यावे लागत आहे.शासनाकडून मिळणारे गणवेशाचे तीन-तेरा वाजले आहेत. फक्त रत्नागिरी तालुक्यालाच गणवेशाचे कापड मिळाले असून उर्वरित आठ तालुक्यांना मात्र गणवेशाचा पत्ताच नाही.जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश या शासनाच्या धोरणाला यंदा खो बसला आहे. शाळा सुरू झाली पण जिल्हा परिषद शाळांमधील ७० हजार चिमुकल्यांना गणवेशाविनाच यावे लागले आहेत. राज्य शासनाने यावर्षीपासून ‘एक राज्य एक गणवेश’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला. पण या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. समग्र शिक्षाअंतर्गत या शैक्षणिक वर्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये १ ली ते ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे.शासनाने १० जूनला या योजनेच्या अंमलबजावणीबाबत नवीन अध्यादेश काढला. हा अध्यादेश संभ्रमात टाकणारा होता. जुन्या निर्णयानुसार दोन गणवेशासाठी शासन कापड देणार होते आणि महिला बचतगटाकडून हे गणवेश शिवून घ्यायचे होते. नव्या आदेशात गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे