
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा कशेडी घाट बोगदा 15 मेपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार.
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा कशेडी घाट बोगदा 15 मेपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे.त्यामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याच्या अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूंना वीजपुरवठा सुरू करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. पोलादपूरकडील वीज यंत्रणा आधीच कार्यान्वित झाली असून उर्वरित बाजूकडील व्यवस्था 15 दिवसांत पूर्ववत केली जाणार आहे.कशेडी घाट बोगदा सुमारे दोन किलोमीटर लांब असून त्याला जोडणाऱ्या मार्गासह एकूण रस्ता अंदाजे नऊ किलोमीटरचा आहे. या बोगद्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांत शक्य होणार आहे.
याआधी याच प्रवासासाठी 40 ते 45 मिनिटांचा वळसा घ्यावा लागत होता.बोगद्यामध्ये दोन्ही बाजूंना 200 पथदीवे बसवण्याचे काम सुरू असून त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे, परंतु 15 मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. बोगद्यात 24 तास अखंड वीजपुरवठा ठेवण्याचा प्रयत्न असून उन्हाळ्यातील गळती टाळण्यासाठी ग्राउंटींग तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सध्या बोगद्यातील कामे अंतिम टप्प्यात असून सुरक्षितता आणि प्रकाशव्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे.