ठाणे बोरीवली अंतर कमी करणाऱ्या दुहेरी बोगदा प्रकल्पाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन!
बोरिवलीवरून ठाण्याला केवळ २० मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा (भूमिगत मार्ग) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र प्रकल्पाच्या नियोजनानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत खर्चात मोठी वाढ झाली असून साधारण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प आता थेट १८ हजार कोटींवर गेला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी, १३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे ते बोरिवली असे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे- बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आखला. मात्र काही कारणाने हा प्रकल्प कागदावरच राहिला. या प्रकल्पाची गरज पाहता हा प्रकल्प एमएसआरडीसी कडून एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर एमएमआरडीएने आराखडा तयार करून आवश्यक त्या मान्यता घेत निविदा प्रक्रिया राबवली. कंत्राट अंतिम केले आणि आता शनिवारी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रकल्प एमएमआरडीएकडे वर्ग झाल्यापासून ते आता प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत प्रकल्प खर्चात मोठी वाढ झाली आहे. एमएसआरडीसीच्या आराखड्यानुसार प्रकल्पाचा खर्च ११,२३५.४३ कोटी रुपये होता. मात्र, आता तो २०२३ मध्ये १६,६००.४० कोटी रुपयांवर गेला आहे. खर्चात पाच हजार कोटी रुपयांनी वाढ झाली. तर आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होताना प्रकल्प खर्च १८ हजार कोटी असा झाला आहे.