काँग्रेसने ट्रॅप लावला आणि गद्दार बरोबर अडकले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा
मुंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेसची 7 आमदार फुटल्याची माहिती आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधान परिषदेत गद्दारी करणाऱ्या आमदारांची यादी हायकमांडकडे सादर केली जाणार आहे.गद्दारांवर कारवाई करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या बैठकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे हायकमांडचे आदेश मिळाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याने शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आहे.मागे चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीवेळी देखील गद्दारी झाली होती. याच गद्दारांची ओळख पटवण्यासाठी काँग्रेसने लावलेल्या ट्रॅपमध्ये गद्दार बरोबर अडकले आहेत. काँग्रेसने मदतान करण्यासाठी दोन गट केले होते. २६ ते २७ आमदारांचा गट सातव यांना मतदान करणार होता. तर, दुसऱ्या गटाला जयंत पाटलांना मतदान करण्यास सांगितले होते. त्यांना डमी पत्रिकेवर खुणा करण्यास सांगितले होते.काँग्रेसच्या चिंतन बैठकीत त्या गद्दारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली आहे. या गद्दार आमदारांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांवर कारवाईसाठी हायकमांडला रिपोर्ट सादर झाल्याची माहिती दिली आहे.