
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज सकाळी ९ वाजेपासून मतदानाला सुरुवात, कोणाचा उमेदवार पडणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुतीत?कोणाचा उमेदवार पडणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने खास प्लान आखला आहे.मिलिंद नार्वेकरांना सुरक्षित करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने खास रणनिती आखली आहे. त्यांनी मित्रपक्षांकडून मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार प्रथम प्राधान्य काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना देणार आहे. त्यानंतर द्वितीय प्राधान्य हे मिलिंद नार्वेकरांना दिले जाणार आहे.प्रज्ञा सातव यांना मतांचा कोटा दिल्यानंतर काँग्रेसकडे १० ते ७ मते शिल्लक राहतात. ही मते काँग्रेसकडून शिवसेना उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना दिली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसला ३ ते ४ मतं फुटण्याची देखील भीती आहे. सध्याच्या घडीला विधानसभेत काँग्रेसचे ३७ आमदार आहेत.जर ४ मते फुटली तर काँग्रेसकडे ३३ मते उरतात. यातून प्रज्ञा सातव यांना काँग्रेस २७-३० मतांचा कोटा देणार आहे. ज्येष्ठ आणि विश्वासू आमदारांचा कोटा हा प्रज्ञा सातव यांना मतदान करेल. यामुळे प्रज्ञा सातव यांचा मतांचा कोटा वाया जाणार नाही. यावेळी हा गट मिलिंद नार्वेकर यांना द्वितीय प्राधान्य ठेवणार आहे.त्यामुळे जर कोणतीही चूक न होता प्रज्ञा सातव यांचा निर्णायक २३ मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ४-७ मते शिल्लक राहतात. ही मते मिलिंद नार्वेकर यांना मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे सध्या विधानसभेत १५ आमदार आणि १ अपक्ष असे १६ आमदारांचे बलाबल आहे. त्यामुळे विजयी होण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना फक्त ७ मतांची गरज आहे.जर काँग्रेसची उर्वरित ७-१० मते दिली तर नार्वेकर यांचा मतांचा कोटा २३-२६ पर्यंत जातो. याशिवाय नार्वेकर यांना द्वितीय प्राधान्य दिल्याने आपोआप सातव यांच्या कोट्यातील ४-७ मते नार्वेकर यांना ट्रान्सफर होतील. मात्र, ही मते ट्रान्सफर होण्यासाठी प्रज्ञा सातव यांना मतदान करताना आमदारांना कोणतीही चूक करून चालणार नाही.