मुंबईच्या पोटातून आता लवकरच मेट्रोची सफर! दररोज 17 लाख प्रवाशांना होणार फायदा!!

देशातील सर्वात लांबीचा भूमिगत मार्ग असलेली मेट्रो मुंबईच्या पोटातून लवकरच धावणार आहे. कफ परेड ते आरे असा 33.5 कि.मी. मार्ग असलेल्या या प्रकल्पाचे एकूण 92 टक्के काम पूर्ण झाले असून ‘कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी’कडून तपासणीनंतर हिरवा कंदील दिल्यानंतर आरे ते बीकेसी असा 12.44 किमीचा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. या मेट्रो प्रकल्पात सरकते जिने, गारेगार प्रवास, लिफ्ट, स्वच्छतागृह, प्लॅटफॉर्म स्क्रीन अशा अत्याधुनिक सेवा असणाऱ्या प्रकल्पाचा फायदा दररोज 17 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी भूमिगत मेट्रो खूप फायदेशीर ठरणार आहे. मेट्रो रेल – 3 या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर 2016 पासून सुरुवात झाली. मेट्रो रेल प्रकल्पात एकूण 27 स्थानके असून कुलाबा -वांद्रे -सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेतील पहिले स्थानक कफ परेड तर शेवटचे स्थानक आरे राहणार आहे. 27 स्थानकांपैकी आरे हे एक स्थानक जमिनीवर असून बाकी सर्व स्थानके भूमिगत असणार आहेत. बीकेसी ते आरे हा 12.44 किमीचा पहिला टप्पा ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर पुढील पाच ते सहा महिन्यांत संपूर्ण मेट्रो रेल मुंबईकरांच्या सेवेत आणण्यायाचे प्रयत्न असल्याची माहिती मेट्रो रेल प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे 37,275.82 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.*दोन तासांचा प्रवास 50 मिनिटांत*एका फेरीत 2500 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. सकाळी 6.30 ते रात्री 11 अशा वेळेत मेट्रोची सेवा असेल. मेट्रोचा ताशी वेग 90 कि.मी. राहणार असल्याने जलद प्रवास होणार आहे. मेट्रोमुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या 50 मिनिटांत होणार आहे. मेट्रो रेलच्या ताफ्यात सध्या 22 गाडय़ा दाखल झाल्या आहेत. यापैकी नऊ गाडय़ा पहिल्या फेजमध्ये प्रवासी सेवेत दाखल होतील.*अशा राहणार सुविधा*या प्रकल्पात सरकते जिने, लिफ्ट, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि प्रवासी माहिती डिस्प्लेची सुविधा, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअरसाठी आरक्षित जागा, स्वच्छतागृह, महिलांसह प्रथमच पुरुषांच्या स्वच्छतागृहांत लहान बाळांसाठी डायपर बदलण्याची सोय, स्थानकांवरील गर्दीच्या वेळी आवश्यकतेनुसार तेथील एअर पंडिशन आणि दिव्यांच्या उपलब्धतेत बदल अशा सुविधा देण्यात येतील.*ही आहेत 27 स्थानके*कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुझ, देशांतर्गत विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो ही स्थानके आहेत.*24 जुलैच्या मुहूर्ताची अफवा*सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्प 24 जुलैपासून सुरू होत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात फिरत आहे. मात्र भूमिगत मेट्रो ‘कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी’ या सेंट्रल एजन्सीकडून मान्यता मिळाल्यानंतरच सुरू होणार आहे. सध्या फिरत असलेला व्हिडीओ फेक असल्याची माहितीही मेट्रो रेल प्रशासनाकडून देण्यात आली.*रेल्वे स्थानकाशी अशी होणार जोडणी** चर्चगेट मेट्रो स्थानक – चर्चगेट पश्चिम रेल्वे स्थानक* सीएसएमटी मेट्रो स्थानक – सीएसएमटी मध्य व हार्बर रेल्वे स्थानक* ग्रॅण्ट रोड मेट्रो स्थानक – ग्रॅण्ट रोड पश्चिम रेल्वे स्थानक* मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक – मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वे स्थानक आणि एसटी बस डेपो* महालक्ष्मी मेट्रो स्थानक – महालक्ष्मी मोनोरेल स्थानक* दादर मेट्रो स्थानक – दादर पश्चिम रेल्वे स्थानक* बीकेसी मेट्रो स्थानक – मेट्रो मार्ग-2 बी (डी. एन. नगर – मंडाले)* मरोळ नाका – मेट्रो मार्ग-1 (घाटकोपर ते वर्सेवा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button