आधार कार्ड प्रमाणेच माहिती अनिवार्य लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदारांना सूचना
रत्नागिरी, : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिनांक २८ जून २०२४ पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नारी शक्तिदूत अॕपद्वारे अर्ज भरताना पात्र महिलेचे नाव, जन्मदिनांक, राहण्याचा संपूर्ण पत्ता इत्यादी माहिती आधार कार्ड प्रमाणे भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आता गाव पातळीवर ऑनलाईन भरण्यास येणाऱ्या समस्या व अडचणी पाहता ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संयुक्त परिपत्रक काढून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात येत आहेत. या योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलेला दीड हजार रुपयांची भेट डीबीटी द्वारे थेट खात्यावर जमा होणार आहे. त्यात कोणतीही अडचण येवू नये यासाठी परिपत्रक जारी केले आहे. नारी शक्तिदूत अॕपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधारकार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे आधारकार्डवरील जन्म दिनांक, अॕप मध्ये नोंदवावा, आधार कार्डवर जन्म दिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरुन दिनांक घेण्यात यावा. आधारकार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि माहिती तंतोतत भरावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर आधार कार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असल्याची खातरजमा करावी. आधार क्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करून तशी माहिती अॕपमध्ये भरावी, अशी सूचना करण्यात आली आहे.*गावपातळीवर ऑफलाईन अर्ज* नारी शक्तिदूत अॕपद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, गावपातळीवर अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत. अर्ज भरण्यासाठी गर्दी वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर आॕफलाईन पध्दतीने पात्र लाभार्थ्याचे अर्ज भरुन घेण्यात यावेत. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये वॉर्ड निहाय शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी दिल्या आहेत. *अर्ज भरण्यासाठी मिळणार प्रोत्साहन भत्ता* गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी अंगणवाडी सेविका, नागरी समुदाय संसाधन व्यक्ती, यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज पूर्णपणे भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतू केंद्रातील प्रतिनिधी समुदाय साधन व्यक्ती, यांना प्रती अर्ज ५० रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देय असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिली.000