सोई व सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर
राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटीलेटरवर असल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, सोयी-सुविधांचा अभाव यामुळे आरोग्य केंद्र केवळ शोभेची बाहुली बनून राहिली आहेत. सागरी महामार्गावरील महत्वपूर्ण अशा जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्पदंश झालेल्या या रूग्णाला या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मोबाईल टॅर्चच्या उजेडात उपचार करावे लागले. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.सागरी महामार्गावरील महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जैतापूर आरोग्य केंद्राकडे पाहिले जाते. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सध्या साथीचे आजार फैलावत आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सर्पदंशासारखे प्रकार घडत आहेत. शिवाय सागरी महामार्गावर अनेकवेळा अपघात घडत असतात. अशा स्थितीत आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या कर्मचार्यांच्या रिक्त पदामुळे पुरेशी सेवा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी काहींच्या जीवन मरणाचा प्रश्नही उपस्थित होतो.www.konkantoday.com