रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची क्युआर कोड सेवासुरू
रत्नागिरी:- डीजिटल बँकिंग सुविधेंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने क्युआर कोड सेवा सुरू केली आहे. त्याचे अनावरण रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते झाले.रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या डिजिटल बँकिंग क्षेत्रातील सुविधा ग्राहकांसाठी यापूर्वीच सुरू केल्या आहेत. बँकेने जानेवारी २०२४ मध्ये युपीआय ही ऑनलाईन सेवा सुरू केली. या सुविधेंतर्गत बँकेने कार्यकारी समितीमध्ये क्युआर कोडबरोबर भीम अॅप या सुविधेचे अनावरण बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व सर्व संचालक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांच्या उपस्थितीत केले. या सुविधेअंतर्गत ग्राहकांकडे स्मार्ट फोन नसल्यास, साध्या मोबाईलद्वारे खात्यामधील रकमेची माहिती (बॅलन्स इन्क्वॉयरी), फंड ट्रान्स्फर आदी बँकिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. क्युआर कोड अनावरणाचे औचित्य साधून सभेत सडामिऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सायली सूर्यकांत सावंत यांना तसेच सोमेश्वर विकास संस्थेकरिता संस्थेचे सचिव प्रभाकर मनोहर मयेकर यांना क्युआर कोड वितरित करण्यात आला. बँकेच्या जिल्ह्यात ७५ शाखा व २ विस्तार कक्ष आहेत. क्युआर कोड सुविधेचा लाभ बँकेच्या सर्व ग्राहकांना होणार आहे. ग्राहकांना डीजिटल तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा मोबाईल अॅपद्वारे आयएमपीएस, एनईएफटी, युपीआय, आरटीजीएस, पॉस ट्रान्झॅक्शन, ई-कॉम, एसएमएस अॅलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट, सीटीएस आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. युपीआय सुविधेमुळे ग्राहकांना टेलिफोन बिल, मोबाईल रिचार्ज, वीजबिल, रेल्वे बुकिंग आदी सुविधांचा लाभ ग्राहक घरबसल्या घेऊ शकतात. जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे व्यापारी, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत आदींनी बँकेच्या क्युआर कोड सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चोरगे यांनी केले आहे.