आता राजापूर वासियांची या पुराच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका व्हावी यासाठी आपण जातीनिशी लक्ष घालू- खासदार नारायण राणे
आता राजापूर वासियांची पुराच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका व्हावी यासाठी आपण जातीनिशी लक्ष घालू. यावर कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी उच्चस्तर अधिकाऱ्यांची बैठक घेवू व सकारात्मक मार्ग काढू अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे दिली. तर वाहतुकीस धोकादायक बनलेला कै. वासुकाका जोशी पुल येणाऱ्या वर्षात नव्याने उभा राहिलेला दिसेल असेही खा. राणे यांनी यावेळी सांगितले.राजापूरात रविवारी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार ना. राणे मंगळवारी राजापूरात आले होते. यावेळी त्यांनी राजापूर शहरात जवाहर चौकात व बाजारपेठेबरोबर अर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केलीव अधिकारी व नागरिक व व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी आमदार ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, प्रांताधिकारी व प्रशासक वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले व्यापारी प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, विवेक गादीकर, अनंत रानडे व व्यापारी आणि नागरिक यांनी शहरात आलेला पुर व निर्माण झालेली परिस्थिती याबाबत माहिती दिली.