
सायबरशी संबंधित गुन्हे घडत असतील तर तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करावी-मुंबईचे माजी पोलिस अधिकारी डॉ. मकरंद वाघ.
सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात हॅकर्सकडून फसवणुकीच्या अनेक घटना घडतात. त्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यापासून स्वतःला वाचवायचे असेल तर प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. अनोळखी कॉल न स्वीकारणे किंवा तो नंबर ब्लॉक करणे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. सायबरशी संबंधित गुन्हे घडत असतील तर तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सायबर तज्ञ आणि मुंबईचे माजी पोलिस अधिकारी डॉ. मकरंद वाघ यांनी केले.सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिकचे अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर राजापूर येथे राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि राजापूर नगर वाचनालय आयोजित बिझनेस मीट २०२४ या कार्यक्रमात डॉ. वाघ बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक फेडरेशन मुंबईचे संचालकमिलिंद आरोलकर, राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा अनामिका जाधव, उपाध्यक्षा विवेक गादीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, महादेव ठाकूर देसाई यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. डॉ. वाघ यांनी सायबर गुन्ह्याची संबंधित उघडकीस आणलेल्या काही प्रकरणांची माहिती दिली.