
विज चोरी करणाऱ्यांकडून वसुली नाही मात्र सामान्य ग्राहक भरडला जातोय वीज बिलात 30% नी वाढ
वीज वितरण कंपनीने एप्रिल महिन्यापासून वीज देयकात तब्बल ३० टक्के वाढ केल्याने जून महिन्यात आलेल्या वाढीव देयकामुळे ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. भरमसाठ वाढ झाल्याचे निदर्शनास येताच अनेक जण महावितरण कार्यालय गाठून चौकशी करीत आहेत.महावितरणने दिलेल्या देयकात इंधन समायोजन शुल्क आकारले आहे. संकटाच्या काळात खरेदी केलेल्या अतिरिक्त विजेचे हे शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क देयकात प्रति युनिट आकारून ग्राहकांकडून वसूल करण्यात आले आहे. प्रति युनिटमागे वाढ झाल्याने देयकामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अतिरिक्त विजेपोटी महावितरणने विजेची दरवाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.दर महिन्याला येणाऱ्या देयकापेक्षा जून महिन्यात देण्यात आलेल्या देयकामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी ४० पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी ७० पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ९५ पैसे व त्यापेक्षा जास्त वापरासाठी १.०५ रुपये प्रतियुनिट शुल्काच्या नावावर प्रति युनिट वसुली करण्यात आली आहे.सध्या १०० युनिटपर्यंत ४.७१ रुपये वीज दर आकारण्यात येत आहे. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत १०.२९ रुपये ग्राहकांना द्यावे लागत आहे. त्यामुळे ५.५७ अतिरिक्त द्यावे लागत आहेत. वीज वापराचा शुल्क व अतिरिक्त विजेपोटीआकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना देण्यात आलेल्या शुल्कात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे.