
परप्रांतीय नौकांच्या त्रासामुळे पेटवून घेण्याचा इशारा
परप्रांतीय फास्टर नौकांचा येथील समुद्रामध्ये पुन्हा धुडगूस सुरू झाल्याने हर्णै बंदरातील पारंपारिक मच्छिमार संतापले आहेत. शासन याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप मच्छिमार करत आहेत. नौकांचा धुडगूस नाही थांबला तर तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेऊ अशी संतप्त प्रतिक्रिया मच्छिमारांनी व्यक्त केली.
पाजपंढरी, हर्णै, दाभोळ, बुरोंडी, आडे, उटंबर, अडखळ, केळशी, कोळथरे, पंचनदी, ओणनवले आदी गावातील नौका हर्णै बंदरात मासेमारी करतात. या व्यवसायातील सुमारे १ हजार नौकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहा हजारांवर रोजगार मिळतो. गेल्या चार ते पाच वर्षापासून समुद्रात आधुनिक साहित्याआधारे परप्रांतीय फास्टर नौका लहान मोठी सर्वच मासळी फार कमी अवधीत मारून नेतात. त्यामुळे तुलनेत कमी प्रगत नौकांना हात हलवत परत यावे लागते. गेले दोन ते तीन महिने या फास्टर नौकांकडून अशाच प्रकारची मासळीची लूटमार सुरू असून या बंदरात मासळीची आवकच कमी झाली आहे. www.konkantoday.com




