रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठोस उपाय योजना न झाल्यास आंदोलन करणार : भाजप आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. वेगवेगळ्या कारणाने खोदण्यात आलेले चर देखील बुजवण्यात आलेले नाहीत. आणि याबाबत रत्नागिरी नगरपालिकेकडे व्यवस्थाही नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरामध्ये रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता साधारणपणे दोन ते तीन वेळा करण्यात आला. मात्र तरी देखील या रस्त्यांवरील खडी वर येऊन या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. दररोज या रस्त्यांवर अपघात घडत आहेत. दुचाकी वाहन चालकांना याचा प्रचंड त्रास होत असून, दुचाकी या खाडीवरून स्लिप होत अपघात होत आहेत. नगरपालिका प्रशासनाने दोन ते तीन वेळा रस्ते करून देखील रस्त्यांची ही अवस्था होत असेल तर यावर नेमकं दोषी कोण? याची जबाबदारी कोण स्वीकारणार..? हे जाहीर करावे. आणि रस्त्यांवर वर आलेली ही खडी त्वरित उचलावी, आणि रत्नागिरी शहर वासियांना रस्त्यांची किमान दुरुस्ती करून दिलासा द्यावा. पुढील आठ दिवसात याबाबत उपाययोजना न झाल्यास संपूर्ण शहरातील रस्त्यावरील खडी नगरपालिका कार्यालय बाहेर आणून आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी दिला आहे.