
राजापुरात भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती
राजापूर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (भाजपा) कडून लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात शनिवारी आल्या. भाजपाचे प्रदेश सदस्य व पक्ष निरीक्षक अतुल कालसेकर व माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालयात या मुलाखती घेतल्या.
राजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांकडून याची जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर करण्यात आला; मात्र महायुतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. भाजपाकडून या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी हाती घेण्यात आली आहे.
शनिवारी भाजपाचे पक्ष निरीक्षक अतुल कालसेकर व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्षपदासह शहरातील दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी मुलाखती दिल्या आहेत. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, ॲड. एकनाथ मोंडे, शहर अध्यक्ष किरण शिवलकर आदींसह भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




