मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’ परीक्षा पुढे ढकलल्या! आज होणाऱ्या परीक्षा १३ जुलैला होणार!!
मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीही दिसत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) आज सोमवार, ८ जुलै रोजी पहिल्या सत्रात म्हणजेच सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षा बुधवार, १३ जुलै रोजी होतील. परीक्षेची वेळ व परीक्षा केंद्रात कोणताही बदल झालेला नाही, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले*दरम्यान, मुंबई विद्यापीठाची बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची ‘एटीकेटी’ परीक्षा आज नियोजित होती. परंतु रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.