पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी पशुपालक, सुशिक्षीत बेरोजगार व महिलांनी 25 जुलै पर्यंत अर्ज करावेत रत्नागिरी, दि. 8 (जिमाका) : पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील पशुपालक बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी दि. 25 जुलै पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पुशधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे
.* जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत 50% अनुदानावर दुधाळ गाय/सुधारित जातीची म्हैस पुरवठा करणे, 50% अनुदानावर शेळी गट ( 5 शेळ्या + 1 बोकड ) वाटप करणे, 90% अनुदानावर स्वच्छ गोठ्याकरिता रबरमॅट वाटप करणे या योजनांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज घेण्याची प्रक्रिया सन 2024-25 या वर्षात राबविली जात आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहे. फोटो ओळखपत्र सत्यप्रत (आवश्यक) आधारकार्ड, सातबारा / 8 अ उतारा ( आवश्यक ), अपत्य दाखला (आवश्यक) स्वयंघोषणा पत्र, 7/12 उतारामध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे, तत्वावर करारनामा ( असल्यास अनिवार्य ), मागासवर्गीय (अनु. जाती/जमाती) असल्यास जातीचा दाखला ( आवश्यक ), रहिवाशी दाखला स्वयंघोषणापत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र दाखला, बँक खाते पासबुक सत्यप्रत (आवश्यक), रेशनकार्ड सत्यप्रत, दिव्यांग असल्यास दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड सत्यप्रत, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रत्नागिरी तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.000