सहा हजार कोटी खर्चूनही मुंबई-गोवा चौपदरीकरण रखडल्याची राज्य शासनाची विधानसभेत कबुली
दहा वर्षात सहा हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. दुरूस्तीच्या कामावरही १९२ कोटी रुपये खर्च केले गेले. भविष्यात त्यावर आणखी खर्च वाढण्याची शक्यता आहे. याची जाहीर कबुली राज्य शासनाने विधानसभेत दिली.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली. एक दशकाहून अधिक काळ बांधकाम सुरू असलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे केवळ ६७ टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावर सन २०१० पासून अडीच हजारपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे श्वेतपत्रिका काढून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदत देण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली होती.www.konkantoday.com