
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ महिलांसाठी ऐतिहासिक योजना लाभार्थ्यांनी शासनाला पत्र लिहून योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे -पालकमंत्री उदय सामंत
*’ रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेचा लाभ मिळल्यानंतर शासनाला पत्र लिहून ही योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.* ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण करुन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, राहूल पंडित, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यावतीने मन:पूर्वक धन्यवाद देतो. उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी 46 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकाच दिवशी 5 हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा आजचा कार्यक्रम हा राज्यातील एकमेव कार्यक्रम आहे. ही योजना जनतेपर्यंत पोहचविणे अधिकाऱ्यांशिवाय शक्य नव्हते, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही. वर्षानुवर्षांसाठी आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाल्यानंतर शासनाला पत्र लिहून ही योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरुन घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत. महिलांना सक्षम करणारे शासन आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून त्यांना लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकाचा ठरेल. प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले.*अंगणवाडी सेविकांसाठी पुण्याचे काम* या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात येत आहेत. आपल्याच महिला भगिनींसाठी या योजनेचा लाभ देण्यास अंगणवाडी सेविकांचा हातभार लागत आहे. हे काम त्यांच्यासाठी पुण्याचे आहे. अंगणवाडी सेविकांना त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद देतोवेव, असेही पालकमंत्री म्हणाले. 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार विद्यावेतन तरुणांना देणारी योजना सुरु केली आहे. शुभमंगल योजनेचे अनुदान 10 हजारावरुन 25 हजार केले आहे. तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. 7.5 एचपी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीज बील माफीचा निर्णय घेतला असल्याचेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले. प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर शासनाच्या सर्वच लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पारदर्शक आणि युध्दपातळीवर प्रशासन तत्पर आहे. या योजनेत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देणारा रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा आहे. *मंजुरीपत्राचे लाभार्थी* मृणाल कामतेकर, पल्लवी धानबा, वृषाली डोर्लेकर, साक्षी धाडवे, अनामिका सावंत, आरती चव्हाण, ज्योती माने, संतोषी शिंदे,आरती सुवारे, पल्लवी सावंत, साक्षी माचकर, राधिका माचकर या लाभार्थी महिलांना आज प्रायोगिक मंजुरीची पत्रे देण्यात आली. तसेच संगिता लोगडे, उज्ज्वला मालप, श्रेया गुरव, राजश्री नाखरेकर, सुजाता आग्रे या महिला लाभार्थ्यांना केसरी शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, दीप प्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूर्वा पेठे यांनी केले. तर श्री. हावळे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी महिला, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.*क्षणचित्रे-** लाभार्थी महिलांनी केशरी फेटे बांधले होते. * तुंडुब भरलेल्या नाट्यगृहामधील महिलांनी मोबाईलचा टॉर्च दर्शवून पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला. * अर्ज भरुन घेण्यापासून अपलोड करुन पोच देणारे स्टाॕल उभारण्यात आले होते. * एकाच दिवशी 5 हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणारे अन् मंजुरी पत्रे देणारे एकमेव शिबीर. * प्रत्येक तहसिल कार्यालयात तक्रार निवारण केंद्र .000