दापोली बाजारपेठ येथे एका लाॅजवरील अनैतिक व्यवहारावर पोलीसांचा छापा महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल
दापोली शहरात भर बाजारपेठेतील एका लॉजमध्ये अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने काल दि.४जून गुरूवारी दुपारी ३.१० च्या सुमारास छापा मारून एक महिला व एक पुरूष अशा दोन संशयितांना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली शहरातील एका लॉजमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली. त्या अगोदर एक डमी गिऱ्हाईक म्हणून या लॉजमध्ये पाठवण्यात आले. या डमी ग्राहकाने या लॉजमध्ये असलेल्या एका व्यक्तीला दोन हजार रुपये दिले. लॉज मधील खोली क्रमांक तीन मध्ये एक महिला बसली होती. त्यानंतर पंचांसमक्ष या व्यक्तीची झडती घेण्यात आली असता या डमी ग्राहकाने दिलेले दोन हजार रुपये या व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात सापडले. ही व्यक्ती या सर्व व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम करत होती. तर व्यवसाय करणारी महिला ही स्थानिक आहे. या पथकाने या दोन्ही संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक विभागाच्या उपनिरीक्षक गायत्री पाटील, हेड कॉन्स्टेबल सांची सावंत, सुभाष भागणे, नितीन डोमणे, शांताराम झोरे तर दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपनिरीक्षक यादव, गंगधर, चव्हाण सहभागी झाले होते. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करित आहेत.