रत्नागिरीत बी टेकच्या परीक्षेत सावळा गोंधळ सखोल चौकशी करा:- युवासेनेची मागणी
रत्नागिरीतील बी टेक कॉलेजमधील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचा सोमवारी वैश्विक मानवी मुल्य या विषयाचा पेपर होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील गोंधळामुळे एका तासातच प्रश्नपत्रिका बदलण्याची वेळ प्रशासनावर आली. विद्यापीठाने कळवल्यामुळे पेपर बदलत असल्याचे सांगण्यात आले. एक तासाने पुन्हा पेपर सोडवण्यास दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवासेनेचे रत्नागिरी तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी करत या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे.रत्नागिरीतील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शैक्षणिक सत्रातील अखेरची परीक्षा सुरु आहे. वैश्विक मानवी मुल्य या विषयाचा पेपर सोमवारी दुपारी दोन वाजता होता. एक तासानंतर तो काढून घेण्यात आला. अचानक पेपर काढून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. प्राध्यापकांनी विद्यापीठाकडूनच सूचना आल्याचे सांगत पुन्हा पेपर द्या, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरा पेपर देऊन तीन तासांचा वेळ देण्यात आला. त्यामुळे पाच वाजता संपणारा पेपर सायंकाळी साडेसहा वाजता संपला. पहिला पेपर विद्यार्थ्यांनी एक तास सोडवला. विद्यार्थ्यांची ती मेहनत वाया गेली. ही घटना समजताच युवासेनेचे रत्नागिरी तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी प्राचार्य यू.व्ही.पाटील यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली.