नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा महाड मधील मुस्लिम समाजाचा इशारा
महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावात गोवंश हत्या व गोरक्षकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात केलेल्या वक्तव्याविरोधात महाडमधील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे.त्यांनी नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावात गोवंश हत्येचा प्रकार गोरक्षकांनी उघडकीस आणला होता. यावेळी गोरक्षकालाही मारहाण करण्यात आली तसेच पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला. तसेच मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी महाड, पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने महाडचे पोलिस उपअधीक्षक शंकर काळे यांची भेट घेत राणेंवर कारवाईची मागणी केली व याबाबतचे लेखी निवेदन पोलिसप्रशासनाला दिले आहे. राणे कणकवलीवरून महाडमध्ये येऊन दोन समाजात तेढ निर्माण करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा महाड, पोलादपूरमधील मुस्लिम समाज जेलभरो आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे