
चिपळूण पोलीस ठाण्यात नव्या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद
भारतीय दंड संहिता (आयपीसी) दंड प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा अधिनियम १८७२ च्या जागी तीन नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू झाले आहेत. नव्याने लागू झालेल्या या फौजदारी कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद सोमवारी चिपळूण पोलीस ठाण्यात झाली आहे. यात एका वृद्धाला लाकडी रिपेने मारहाण व शिवीगाळ प्रकरणी गणेश मोहिते (नवीन वसाहत, कापसाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन वर्षापासून सुरू असलेल्या वादातून वसंत शंकर पंधरे (६६, कापसाळ) या वृद्धाला गणेश मोहिते याने लाकडी रिपेने मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कापसाळ येथे घडली. याप्रकरणी मोहिते याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात नव्या काद्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ११८ (१), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वसंत पंधरे व गणेश मोहिते यांच्यात दोन वर्षापासून वाद आहेत. सोमवारी सकाळी पंधरे हे त्यांच्या भाच्याकडे जात होते. ते कापसाळ रस्त्याने जात असताना मोहिते याने त्यांना बोलवले. मोहिते हा फर्निचरच्या दुकानात काम करतो. पंधेरे तेथे आले असता मोहिते याने त्यांना रिपेने मारहाण केली. यावेळी त्या रिपेला असलेला खिळा पंधरे यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले.www.konkantoday.com