लांज्यात बागेत आढळले दुर्मिळ शेकरू
तालुक्यातील भांबेड येथील मुंबईस्थित नवल शेवाळे यांच्या बागेत शेकरू हा अत्यंत दुर्मीळ प्राणी आढळला आहे. या शेकरूचे झाडांवर बागडतानाचे दृश्य नवल शेवाळे यांनी टिपले आहे. लांजा तालुक्यात शेकरू आढळणे, ही गाेष्ट सुखद आणि दिलासा देणारी असल्याचे लांजाचे वनपाल दिलीप आरेकर यांनी सांगितले.नवल शेवाळे मूळचे भांबेड येथील असून, ते मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांनी भांबेड येथे काजू आणि आंब्याची बाग जोपासली आहे. दोन दिवसांपूर्वी ते गावी आले आहेत. बागेत गेल्यानंतर त्यांना एक वेगळा प्राणी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना दिसला. लांबून माकडासारख्या दिसणाऱ्या या प्राण्याविषयी त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. तसेच त्यांचे बागडतानाचे चित्रीकरणही केले.