मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना दाखल्यांसाठी विकेंद्रीत शिबीरांचे आयोजन कराः पारदर्शक कामकाज करा – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
*’रत्नागिरी, दि. 2 (जिमाका):- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज भरण्यासाठी विकेंद्रीत पध्दतीने प्रत्येक तहसिलदारांने शिबीरांचे आयोजन करावे. पारदर्शक कामकाज करावे. तसेच, एकाच केंद्रावर गर्दी होणार नाही, याची दक्षताही घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार प्रसिध्दी करावी. प्रमुख ठिकाणी फलक उभे करावेत. या योजनेचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याने लाभार्थ्याचा अर्ज भरताना सर्व माहिती भरल्याची खात्री करावी. उत्पन्नाचे दाखले, अन्य कागदपत्रं देण्यासाठी आणि एकूणच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत पारदर्शीपणे कामकाज करावे. त्यासाठी प्रत्येक तहसिलदाराने नियंत्रक अधिकारी म्हणून काम करावे. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी या योजनेच्या शासन निर्णयाबाबत संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. ‘नारीशक्ती दूत’ नावाचे ॲप डाऊनलोड करुन लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याचेही ते म्हणाले.