
युनेस्कोचे तज्ञ पथक २ ऑक्टोबरला दापोलीत
. भारत सरकारने दापोली तालुक्यातील हर्णे येथील सुवर्णदुर्गला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा बहाल केला आहे. शिवाय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळावा, यासाठी भारताकडून पाठवलेल्या मानांकन प्रक्रिया यादीतही सुवर्णदुर्गचा समावेश आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच आता युनेस्कोच्या तज्ञांचे पथक २ ऑक्टोबरला सुवर्णदुर्गच्या पाहणीसाठी दापोलीत येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान व महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशांची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूच्या जिजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट २०२४-२५ मध्ये नामांकन मिळाले आहे. यात सुवर्णदुर्गचा समावेश आहे. यामुळे या शिववारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे. www.konkantoday.com