कोकण रेल्वेच्या गाड्या धावताहेत विलंबाने मात्र प्रवाशांना पावसाळ्यात सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड
कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू असल्याने सर्वच गाड्यांचा वेग मंदावला आहे. रेल्वेगाड्यांच्या वेगावर घालण्यात आलेल्या मर्यादांमुळे २ ते ३ तास विलंबाचा प्रवास करावा लागत असतानाही धिम्या प्रवासातही तिकिटावर अजिजलदचा अधिभार द्यावा लागत आहे. यामुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना पावसाळ्यातील प्रवासात हकनाक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या भुर्दंडामुळे प्रवासी मेटाकुटीस आले असून नाराजीचा सूर आळवत आहेत.पावसाळ्यात उदभवणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू केले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्या धिम्यागतीने धावणार आहेत. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास आणखी वेगमर्यादा कमी होणार आहे. वर्षातील १४४ दिवस पावसाळी वेगमर्यादा लागू करण्यात येत असल्याने प्रवाशांना २ ते ३ तास विलंबाचा प्रवास करावा लागतो.अप व डाऊन अशा दोन्ही दिशांनी सरासरी ताशी ५५ कि.मी. पेक्षा जास्त वेगाने धावणार्या रेल्वेगाड्यांना सुपरफास्ट दर्जा दिला जातो. मात्र पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्या ताशी ४० ते ४५ कि.मी. वेगाने धावतात. एकीकडे पावसाळ्यात खबरदारी म्हणून रेल्वेगाड्या धिम्या गतीने चालवत असताना दुसरीकडे मात्र अतिजलद अधिभारानुसारच तिकिट आकारणी केली जात असल्याचे कोकण मार्गावर पावसाळ्यात प्रवास करणार्या प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. www.konkantoday.com