कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद, माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू
मराठी माणसाला, त्यातही कोकणी माणसाला उद्योग करता येत नाही, असे म्हटले जाते. मात्र आज ज्या ५ जणांचा येथे पुरस्कार देवून सन्मान होत आहे. त्या कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले.रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्यावतीने देण्यात येणार्या पुरस्कारांचे वितरण रविवारी चिपळूण शहरातील बहाद्दूर शेख नाका येथील सहकार भवनात पार पडले. यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, जगाला काय हवे, याचा शोध घेवून उद्योग सुरू केल्यास तो कायम टिकतो. या ५ जणांनी जगाची गरज ओळखून उद्योग सुरू केल्याने ते जागतिक पातळीवरचे उद्योजक होवू शकले. कोकणी माणूस मनात आणले तर काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श हे ५ जण आहेत. त्यामुळे असे किर्तीवान उद्योजक घडले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.उद्योजक दीपक गद्रे यांचा जीवनगौरव, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने वाशिष्ठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लिमिटेडचे प्रशांत यादव, सीएसआर पुरस्काराने लोटेतील घरडा केमिकल्स लिमिटेड, जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्टस प्रा. लि.चे उद्योजक निलेश चव्हाण, जिल्हा उद्योजकता पुरस्काराने डिलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनिल देवळे यांना गौरविण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, डॉ. विनय नातू, सचिन कदम, उमा प्रभू, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, स्मिता चव्हाण, ऍड. नयना पवार, फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत, उपाध्यक्ष धनंजय यादव, सेक्रेटरी केशव भट, रघुवीर सावंत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मीनल ओक यांनी केले. www.konkantoday.com