कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांचा रेल्वे कर्मचाऱ्यांशी थेटसंवाद!
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व कर्मचारी वर्गाशी थेट संवाद साधत आहेत. या मध्ये विशेषतः प्रवाश्यांना च्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाशी थेट संबंधित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर गाड्या चालवणारे लोको पायलट,असिस्टंट लोकोपायलट यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांशी संतोष कुमार झा यांनी संवाद साधला.हजारो प्रवाशांचा सुरक्षित प्रवास या मंडळींच्या हातामध्ये असतो.यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, आपले आरोग्य आणि मानसिकता राखण्यासाठी काय केले पाहिजे यापासून कुटुंबीयांनी या व्यक्तींना कशा पद्धतीने सांभाळले पाहिजे या बाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले . ट्रेन चालवताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत जेणे करून हजारो लोकांचा प्रवास सुरक्षित होईल या बाबत संतोष कुमार झा यांनी सूचना दिल्या .लोको पायलट यांचे बरोबरच पी वे इन्स्पेक्टर,तिकीट तपासनीस यांच्याशी ही संतोष कुमार झा यांनी संवाद साधला. प्रवाशांशी थेट संबंध येणाऱ्या तिकीट तपासनीसानी आपल्या कर्तव्यात कसूर न करता प्रवाशांशी कशा पद्धतीने संवाद साधावा याचे मार्गदर्शनही संतोष कुमार झा यांनी केले. कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध सेक्शन मध्ये जात झा कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत त्यांचे मनोबल वाढवत आहेत.शनिवारी मडगाव येथे संवाद साधल्या नंतर सोमवारी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील काजळी क्लब येथे झालेल्या या संवादामध्ये व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या सह विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे आणि कोकण रेल्वे चे अन्य अधिकारी हि उपस्थित होते.