कोल्हापूर : दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. ‘राजाराम’सह 5 बंधारे पाण्याखाली!
रात्री 8 वाजता पंचगंगेची पातळी 17 फूट 6 इंचावर होती. तीन दिवसांत पाणीपातळीत साडेतीन फुटांची वाढ झाली आहे. कोल्हापुरात सरासरी 14.6 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक 44.2 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे. जवळपास अख्खा जून कोरडा गेल्यानंतर तीन दिवसांपासून हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री 11 नंतर काहीकाळ पावसाच्या जोरदार सर्या कोसळल्या होत्या. शनिवारी सकाळपासूनच शहरात दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार कमाल तापमान 29.1 अंशावर तर किमान तापमान 22 अंशावर होते.जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात 42.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर पन्हाळा 22.7, भुदरगड 21.1, आजरा 13.7, राधानगरी 13.4, गडहिंग्लज 11.7, करवीर 9.2, चंदगड 9.0, कागल 7.3, हातकणंगले 5.9, शिरोळ तालुक्यात 4.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.