वाहनेही बनावट आणि टेस्टही बनावट! जारी केले 76000 ड्रायव्हिंग लायसन्स!!
प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. आता आणखी एक घोटाळा समोर आला असून राज्य सरकारच्या एका अहवालात तशी आकेडवारी देण्यात आली आहे. अंधेरी RTOने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे 76 हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केल्याचे या अहवालात म्हटले आहे. परिवहन खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून परिवहन कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत चालली असल्याचे सांगण्यात येते.अर्जदार वा उमेदवाराची अनिवार्य ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधितांना दिले जाते. याअनुषंगाने ‘सारथी’च्या ऑनलाइन डेटाद्वारे 1.04 लाख ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. 2023-2024मधील या 1.04 लाख ड्रायव्हिंग लायसन्सपैकी 76 हजार 354 लायसन्स अवैध वाहनांवर कथित ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर जारी करण्यात आले होते. हे प्रमाण जवळपास 75 टक्के असल्याचे या अहवालावरून दिसते.दुचाकी आणि कार अशा केवळ चार वाहनांचा वारंवार वापर स्कूटरपासून क्रेनपर्यंत विविध श्रेणींच्या वाहनांसाठी ही 76 हजार 354 ड्रायव्हिंग लायसन देण्यात आल्याचा पर्दाफाश ड्रायव्हिंग लायसन्सच्या डेटामुळे झाला. यासंबंधीचे तपशीलही या अहवालात देण्यात आले आहेत. दोन दुचाकींवर 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर 35 हजार 261 ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. लाइट मोटार व्हेइकलसाठी (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करताना दुचाकी वाहनांवर (मोटारसायकल) टेस्ट घेण्यात आल्या होत्या. तर, लाइट मोटार व्हेइकलवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन मोटारसायकल तसेच स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले. याशिवाय, तीनचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी मोटार किंवा दुचाकी वाहनांवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन लायसन्स जारी करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.LMV साठी परवाने जारी करण्यात आले होते परंतु वाहन चालविण्याच्या चाचण्या दुचाकी (मोटारसायकल) वाहनांवर घेण्यात आल्या होत्या. मोटारसायकल/स्कूटर श्रेणीसाठी DL जारी करण्यात आले होते परंतु LMVs वर ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तीनचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी डीएल जारी करण्यात आले होते परंतु मोटार किंवा दुचाकी वाहनांवर ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामुळे या सर्व चाचण्या घेतल्या गेल्या होत्या की नाही याबद्दल साशंकता निर्माण होते. ही प्रकरणे केवळ उदाहरण म्हणून आहेत. ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी कागदपत्रांबाबत योग्य प्रक्रियांचे पालन तसेच, संबंधित आरटीओ इन्सपेक्टरकडून वाहन तपशीलांची पडताळणी कशा प्रकारे केली गेली नाही, हे स्पष्ट होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.या अहवालानंतर आरटीओने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. ड्रायव्हिंग टेस्ट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची चौकशी तसेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाण्याची शक्यता आहे.